शीर्षक:- ध्येयासक्ती
भाग-३ (अंतिम )
अमित गेल्यावर त्याच्या युनिटच्या कमाडिंग ऑफिसर व त्यांच्या पत्नीच्या प्रेरणेने आरोही हरवलेलं तिचे स्वत्व शोधू लागली. आर्मी ऑफिसर व्हायचं ! छे ! छे ! तिच्यासाठी सैन्यात जाण्याचा विचार कल्पनेच्या पलिकडचा होता. पण निराशेच्या एकेक क्षणांवर मात करत वेदनांचं तिने इंधन केलं.
सुरुवातीला ती एक स्त्री आहे, तिला अवघड असे सैन्याचं ट्रेनिंग जमेल काय? दोन दिवसांत ती पळून येईल?असे म्हणून काही लोक तिची खिल्ली उडवू लागले. तर काही लोक बायकांच्या जातीने तिथे जाऊ नये, ते काय खायचं काम आहे का? असे म्हणत तिच्या विचारांवर टोमणे मारू लागले. तिचे खच्चीकरण करू लागले. पण तिने कोणाच्या बोलण्याचा विचार केला नाही की ते बोलणं मनावर घेतलं नाही. ती तिच्या विचारांवर ठाम होती. काहीही झालं तरी आता मागे हाटायचे नाही हा विचार तिने मनात पक्का होता. त्यात तिचे सासुसासरे व आईवडिल दोघांनी तिला साथ देत तिला प्रोत्साहन देत होते.
आरोहीने जेव्हा तिचा सैन्यात जाण्याचा विचार त्यांना बोलून दाखवला तेव्हा त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या विचारांचे समर्थन केले. ते तिला म्हणाले," आरू, बेटा आम्हाला तुझा खूपच अभिमान वाटतो. असे निर्णय घ्यायला खूप मोठं धाडस लागतं, बेटा. तू बिनधास्त जा, स्वप्नाची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही तिची काळजी घेऊ, तिचा व्यवस्थित सांभाळ करू. अमित जरी हयात नसला तरी तो तिच्या रूपात आपल्या सोबत आहे. त्याचीही इच्छा होतीच तू काही तरी बनावेस. तो जर असला ना तर त्याने तुझे कौतुकच केले असते. तेव्हा बेटा, बिनधास्त जा आणि यशस्वी हो."
"धन्यवाद, मामांजी. तुम्ही परवानगी दिलीत, मला समजून घेतलंत. खरंच मनावरचं खूप मोठं दडपण दूर झालं. पण लोक .. " तिचे बोलणे मधेच तोडत पद्मिनी म्हणाल्या,"बेटा, लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी." त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवले. त्यावेळी तिचे आईवडीलही तिथेच होते. त्यांनाही तिचा विचार पटला होता. आपल्या लेकीच्या पाठीशी इतकं खंबीरपणे उभे राहणारे सासर भेटले म्हणून त्यांचे मन आनंदाने भरून गेलं.
वसंतराव पुन्हा म्हणाले, "आरू, अजून एक आता तू आमची सून नाही, मुलगी आहेस त्यामुळे आम्हांला आईबाबा म्हण. आजपासून तू आमच्यासाठी आरोही आणि अमितही तूच आहेस. अमितचे देशसेवेचे अधुरे स्वप्न आता तुला पूर्ण करायचे आहे. कम ऑन माय ब्रेव्ह डाॅटर! ऑल द बेस्ट, बेटा! " ती 'आईबाबा' म्हणत साश्रू नयनांनी त्यांना आनंदाने बिलगली.
अमितचे स्वप्न तिला पूर्ण करायचे होते, त्यासाठी आरोहीला पुन्हा उभे राहावे लागले. त्यासाठी खचून न जाता खंबीर राहावे लागणार होतं. त्यासाठी तिची कितीही कठोर परिश्रम करायची तयारी होती. स्वप्नाला अमितने ठरवल्याप्रमाणे मोठं करायचे होते. या प्रवसात तिला पद्मिनी व वसंतराव, गोविंदराव व राधा यांची मोलाची साथ लाभली. छोट्या स्वप्नाला त्यांच्या स्वाधीन करून तिने आर्मी जाॅईन केला. तिच्या स्वप्नांना पुन्हा नवीन पंख लाभले. तिचा खडतर प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेंनिंगसाठी तिला शरीराबरोबर मनालाही स्ट्राँग करावं लागलं.
इंग्लिश बोलण्यापासून ते अनेक विषयांच्या अभ्यासापर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. अखेरीस एस. एस. बी. आणि निवडीसाठीचा हा टप्पा पार करून ओ. टी. ए. प्रशिक्षणासाठी ती दाखलं झाली. तिथे कोणतीही विशेष सवलत न घेता इतर लेडी कॅडेट्समध्ये ती मिसळून गेली. तिने सिनिअर्सकडून तेवढ्याच शिक्षा सहन केल्या. रक्तबंबाळ होईपर्यंत खडतर वळणे पार केली.
कित्येकदा तिला ट्रेनिंगमध्ये शरीराला इजा होती, रक्त वाहत होतं पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिला तिची ध्येयासक्ती पूर्ण करायची होती. 'काही झाले तरी मागे हटू नकोस, तू मेहनत करतेस त्याचे फळ तुला नक्की मिळेल! कर हर मैदान फतेह!' हे अमितचे बोलणे तिला नेहमी आठवायचे, ते प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या बोलण्याने तिच्यात स्फूर्ती निर्माण होऊन पुन्हा नव्याने उमेदीने साऱ्या आव्हानांना सामोरे जात होती.
ट्रेंनिंगच्या ब्रेकमध्ये जेव्हा ती अमितच्या श्राध्दासाठी घरी गेली. तेव्हा खुरटे केस, हातापायाला आलेले फोड, प्रचंड शारीरिक मेहनतीला सामोरं जाणरं कृश शरीर, काळवंडलेला चेहरा पाहून छोट्या स्वप्नाने आरोहीकडे येण्यास नकार दिला. तिने आईला ओळखलंच नाही. तरीही आरोहीने धीर सोडला नाही.
' मला वरून बघत असलेले अमित आणि आताची लहानगी स्वप्ना यांना एक दिवस माझा अभिमान वाटेल.' या विश्वासावर तिने वाटचाल सुरूच ठेवली. 'क्राॅस कंट्री' या रनिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवून सैन्याधिकारी म्हणून तिने शपथ घेतली. अमितप्रमाणे तिनेही वर्दी चढवली आणि भारतीय सैन्यात जवानाची पत्नीने 'अधिकारी' होण्याचा इतिहास रचला. वीरपत्नी आणि समस्त स्त्रियांसमोर तिने साहसाचा मोठा आदर्श घालून दिला. आज कितीतरी सैनिकांचे समर्थपणे नेतृत्व करतं स्वप्नाला सोबत घेऊन मेजर आरोही सैन्यात कार्यरत झाली.
समाप्त-
संकट आली तर खचून न जाता खंबीर राहावे.
ध्येयासक्ती मनात असेल माणूस काहीही करू शकतो मग ती स्त्री का असेना?
ध्येयासक्ती मनात असेल माणूस काहीही करू शकतो मग ती स्त्री का असेना?
"हर धडकते दिल के पीछे एक जज़्बा होता है, और जब वो देश के लिए धड़कता है, तो इतिहास रचता है।"
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
प्रेरणादायी फेरी
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.